शस्त्र आणि शास्त्राचे मिलन - अफजल खान वध

पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा सर्वात मोठे पराक्रम उदाहरण म्हणून सांगितले जाते, ते म्हणजे अफजल खान वध. जसे नृसिंहाने गर्विष्ठ हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढला, तसाच चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथळा बाहेर काढला; ज्याची दहशत आजही आहे. आजही अफजल खान वधाच्या चित्राने अनेकांना त्रास होतो, अनेकांना भीती वाटते म्हणजे आजही दहशत आहे. आणि पुढेही राहील. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरणही तितकेच महत्त्वाचे. प्रत्येक लढाया या काही मैदानात, रणांगणावर लढल्या जात नाहीत, तर शत्रूला राजकीय पटलावर हरवणे ह्यासाठी लढाईहुन अधिक कितीतरी पटीने संयम आणि बुद्धी लागते. आणि असा संयम, असा पराक्रम शिवाजी महाराजांनी केला. 

मार्गशिष शुद्ध सप्तमी म्हणजेच 'श्री शिवप्रताप दिन' या दिवशी छ.श्री शिवाजी महाराजांनी बत्तीस दाताचा बोकड कापला. अधर्मावर धर्माने मात केली, असा हा सुंदर दिवस. पण हा दिन साजरा करताना लोकांना या दिवसाचे महत्त्व पटवुन देताना शिवरायांनी शक्ति पेक्षा युक्ति केली हे देखील तितकेच महत्त्वाचेच आहे हे सांगणे गरजेचे आहे. यामध्ये मोलाची मदत आणि मार्गदर्शन करण्यामागे चेहरा होता, समर्थ रामदास स्वामींचा! 

  'राजकारण बहुत करावे। परंतु कळोची नेदावे' 

 हे तत्व केवळ समर्थानी सांगितले नाही, तर ते अफजल खान वधामुळे सिद्धही केले. त्यामुळेच आजतागायत समर्थांचे नाव या पराक्रमात कोणालाही समजले नाही. 

अफजल खानाचा वध ही काही दोन दिवसात केलेली योजना नव्हती. महाराजांचे गुप्तहेर तल्लख होते. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य रामदासी यांचा देखील होता. अफजला बद्दल माहिती देताना, समर्थ शिवरायांना पत्र पाठवतात. ते पत्र म्हणजे आजच्या समर्थ लिखित ग्रंथराज श्रीमत् दासबोधमधील दशक अठरावा बहुजिनसी, आणि समास सहावा उत्तमपुरुषनिरुपण नाम. या समासात पहिल्या १२ ओवीमध्ये समर्थ अफजलाचे वर्णन करतात. व त्याला कसा मारावा हे हि सांगतात. त्यातील काही ओळी इथे लिहीत आहे. 

तुंड हेकांड कठोरवचनी। अखंड तोले साभिमानी। न्याय नीती अंतःकरणी। घेणार नाही।।3।।

ऐसें लौंद बेईमानी। कदापि सत्य नाही वचनी। पापी अपस्मार जनी। राक्षेस जाणावे ।।5।।

या वर्णनानंतर समर्थानी त्यात लिहिलेल्या दोन ओळी फार भावल्या. समर्थ शिवरायांना सावध करताना म्हणतात, की

बरे ईश्वर आहे साभिमानी। विशेष तुळजा भोवानी।परंतु विचार पाहोनी। कार्ये करणे ।।9।। अखंडची सावधाना। बहुत काये करावी सुचना। परंतु कांहि येक अनुमाना । आणिले पाहिजे।।10।।

अफजलखान दिसायला कसा आहे? याहून महत्त्वाचे त्याची वृत्ती किती राक्षसी आहे. हे समर्थ सांगतात, पण हे कार्य करताना सावध देखील करतात. तो राक्षसी आहे पण आपला ईश्वर देखील साभिमानी आहे. विशेष करून तुळजा भवानी आपले रक्षण करेलच. पण अखंड सावधान राहा. एकीकडे समर्थ त्यांना लढण्यास मदत करत आहेत, पण त्यांची काळजीही वाहत आहेत. 


त्या पत्रानंतर जेव्हा अफजलखान विजापुरहुन निघाला, तेव्हा ही बातमी सांगणारे शिवरायांचे एकमेव गुप्तहेर समर्थच होते. गिरिमाजी गोसावी यांच्या हस्ते १६५९साली  पुरंदरवर गुप्त असे 'आद्यक्षराचे' म्हणजेच पहिल्या अक्षरांमधून संदेश देणारे एक पत्र समर्थ पाठवतात. त्यात पहिले अक्षर घेतले असता, कळते कि "विजापुरचा सरदार निघाला आहे" असे लिहिले आहे. परंतु, दुर्दैवाने हे बिंग फुटते. पण तरी सुद्धा कार्य घडते. हा गुण शिवरायांचा उल्लेखनिय! आणि अफजल खानाचा वध झाला. समर्थ व इतर मावळ्यांच्या सोबतीने आजच्या दिवशी अफजल खान मारला हे धाडसी साहस इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिले गेले.

या विजयानंतर देखील शिवरायांना समर्थ पत्र पाठवतात. त्यात शिवरायांचे कौतुक आहे, पण सोबतच त्यांना गर्व येऊ नये म्हणून 'देणे ईश्वराचे' देखील लिहिले आहे. ते पत्र म्हणजे दासबोधातील वर लिहिलेल्या समासातील उरलेल्या दहा ओळी आहेत. त्या प्रत्येल ओळीत जरी शिवरायांच्या साहसी कामगिरीचा गौरव केला असला, तरी शेवटी 'देणे ईश्वराचे' असे लिहिले असले, तरीही एका ओळीमध्ये समर्थ शिवरायांना ईश्वराचेच अवतार असल्याचे म्हणतात. 


धर्मस्थापनेचे नर। ते ईश्वराचे अवतार। जाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचे।।

आज शिवछत्रपती आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संबंधावर अनेक जणांना आक्षेप आहेत. परंतु, आक्षेप करणाऱ्यांनी कधी समर्थ जाणून घेतले नाहीत. असो, पण अफजल खान वध हा भक्ती आणि शक्तीचाच संगम होता. ज्याचा आदर्श सूर्य-चंद्र असे पर्यँत या भूतलावर राहील.

- नेहा जाधव.

follow me - Facebook - https://www.facebook.com/JadhavNeha Facebook page - https://www.facebook.com/nehadiario Instagram - https://www.instagram.com/reporter_madam Twitter - https://www.twitter.com/NehaJad03549392

Post a Comment

0 Comments