नेहा जाधव
देवीची नवरात्र जवळ आली. घटस्थापना दिवशी देवीचे घट घरोघरी बसणार आणि मंडळात रासदांडिया खेळला जाणार. दांडिया, गरबा खेळणे वाईट नाही. पण समर्थ रामदास स्वामी म्हणतात, की 'जाऊ नये तेथेची जावे, पंरतु विवेकासहित! आपण देवाकडे मागताना आयुष्यात सर्वकाही मागतो. घर दे, गाडी दे, पैसे दे असे आपल्याला हवे ते सर्वकाही. आपल्या दुःखापासून सुरू होणारी यादी, आपण सुखी संसारापर्यंत नेऊन ठेवतो. पण, आपण कधी देशाचा उध्वस्त झालेला संसार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मागणे मागितले आहे का?? नाही. कारण ते मागणं मागण्यासाठी देशा-धर्मावर प्रेम असावे लागते. हे मागणे ज्यांनी मागितले, त्या देवासमान व्यक्ती म्हणजे आई जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंतःकरणाची पिढी तयार होणे हि काळाची गरज आहे. आणि ते अंतःकरण, ती जागा, ती जाणीव आणि आपला विवेक जागवणारा उपक्रम म्हणजे 'श्री दुर्गामाता दौड'.
श्री शिवछत्रपतींच्या जन्माआधी देशावर पारतंत्र्याचा अंधःकार दर दिवशी अति दाट होत चालला होता. परंतु हिंदु क्षुद्र होऊन ते लाचार जीवन पत्कारत होता. अशा अन्यायी,अत्याचारी काळात शिवबा पोटी असताना, प्रतिवर्षा प्रमाणे जिजामातेने नवरात्रीत घट बसवले. त्यात त्यांनी आपल्या संसारासाठी नव्हे, भोसले घराण्यासाठी नव्हे, तर कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रम्हदेश ते बलुचिस्तान पसरलेला भारतमातेचा उध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद दे हे मागणे मागितले. हे मागणे स्वतः साठी नसुन समस्त हिंदु समाजासाठी होते. आणि त्याचे फळ म्हणजे सातशे वर्षाच्या पारंतत्र्यात असलेल्या भीषण काळरात्री श्री शिवनेरीवर श्री शिवछत्रपतींच्या रुपाने पुण्यश्लोक जिजाऊंच्या पोटी जन्माला आले. म्हणुन जी दौड करायची त्यात देवीकडे मागितलेल हे मागणं म्हणजे स्वतःचा संसार आणि घरादारासाठी न मागता देशाचा उद्धस्त झालेला संसार पुर्नप्रस्थापित होण्यासाठी मागण मागयचे.
मग 'दौड' हेच नाव का?
आ. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी 'श्री दुर्गामाता दौड' या उपक्रमाची सुरुवात केली. भिडे गुरुजींचे आचरण, शब्द, त्याग या प्रत्येकात एकच स्वप्न, ध्यास दडले आहे. ते म्हणजे हिंदुस्थानचा संबंध हिंदू तरुण हा अखंड देशा-धर्मासाठी लढला पाहिजे, झगडला पाहिजे आणि दौडला पाहिजे. धावणे हा किती सोपा शब्द आहे. आपण सहज एखाद्या लहान बाळाला म्हणतो धाव. तो आपलं सांगून ऐकतो आणि धावतो. पण एखाद्या लहान काय मोठ्या व्यक्तीला म्हंटले की दौड. तर तो खरंच दौडेल का? तर अजिबात नाही. कारण दौड ही धावण्याइतकी साधीसुधी गोष्ट नाही. माणूस धावतो तो मर्यादित काळापर्यंतच पण जर दौडायचे असेल तर अखंड आयुष्य खर्ची करावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अखंड आयुष्यात अविरत लढले, झगडले आणि दौडले. महिषासुरमर्दिनीचा आशीर्वाद लाभून शिवरायांनी आणि शंभूराजांनी घर,दार, संपत्ती सर्वांचा त्याग करून हिंदवी स्वराज्य उभारले.
- नेहा जाधव
0 Comments