डॉ. प्रवीण माने यांनी केली सुटका... #देवमाणूस भाग - १




माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या. 

नेहा जाधव 

कोरोना आजाराबाबत समजले, त्यावेळी त्याच्यावर अनेक विनोद केले. पण, तो जसा जसा अधिक विक्राळ होत गेला, तेव्हा जाणवलं की ही विनोदाची गोष्ट नाही. त्याची अधिक भीती वाटू नये, म्हणून खिल्ली उडवणे तसे सुरु होते. पण, एक मात्र नक्की होते, की कोरोना हा सर्वांना होणारच आहे. काहींना त्याच्यामुळे जास्त त्रास होईल, तर काहींना झाला तरी समजणार नाही. अशातच एकुलते एक मामा गेले. तेही कमी वयात. संकटांना न घाबरणारा माणूस बाजूच्या बेडवरील माणूस गेला या भीतीने रिपोर्ट येण्याआधीच प्राण सोडून मोकळा झाला. या पहिल्या धक्क्या नंतर दुसरा धक्का म्हणजे मोठ्या भाऊजींचे वडील अवघ्या पन्नासव्या वर्षी कोरोना संपूर्ण शरीरात शिरकाव करूनही वेगळ्या आजारामुळे गेले. या दोन्ही घटनेने आम्ही हादरलो होतो. हॉस्पिटलमध्ये चाललेला काळा बाजार लोकांना अधिक त्रस्त करत होता आणि अजूनही आहेच. हॉस्पिटलमध्ये जाऊ पण पुन्हा येऊ का? या भीतीने अनेकांना हृदयविकाराचे झटके आले आहेत. बहिणीचे सासरे गेले, त्या आधीच्या रात्री मी तिला तिचे काही कपडे देयला गेले होते. बिल्डिंगखालीच अगदी लांबून कपडे देऊन निघून आले तोच खोकला सुरू झाला. आणि शंकेला सुरुवात झाली. पण, त्या भेटीमुळे काही होईल असे नव्हते. कारण तिचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. त्या दिवशी बस-स्कुटी-रिक्षा असा भयंकर कामानिमित्त प्रवास झाला होता. त्यामुळे धुळीच्या त्रासाने खोकला आहे हे वाटले. दुसऱ्या दिवशी दिवसभर मायग्रेनच्या त्रासाने डोळे उघडलेच नाहीत. संध्याकाळी पावणे सहाला डोळे उघडले आणि त्याच वेळी बहिणीच्या सासर्यांनी प्राण सोडले. तेथून पुढचे तीन दिवस म्हणजे ५ सप्टेंबर ते 7 सप्टेंबर तणाव, आणि घरच्यांना सावरण्यात गेले. त्रास जाणवत होता, पण दुःखात लक्ष गेले नाही. 8 तारखेला लहान बहिणीचा वाढदिवस होता. त्या दिवशी आईला भयंकर डोकेदुखी सुरू झाली. कधीही आजाराने न झोपणारी बाई दुपारभर झोपली. सुकी सर्दी होती. ताप जाणवत होता म्हणून लगेच चेक केलं तर ताप 100 होता. ती संध्याकाळी सहाला उठली आणि मी काम आवरून झोपले. मला देखील 100 ताप, डोकेदुखी, सर्दी-खोकला सुरू झाला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरने सांगितले, लक्षणे तर कोरोनाची आहेत. फक्त आई-वडिलांपासून लांब राहा. लगेच घरी येऊन हक्काच्या माणसाला फोन केला. हो कारण माझा सगळ्यात जास्त विश्वास आयुर्वेदावर आहे. एलोपेथि अथवा होमिओपेथीवर देखील विश्वास आहेच. पण मी मरणाच्या दारात असताना, मुंबईभर फिरून आयुर्वेदाने मला प्राण दिलेले आहे. खाजगी हॉस्पिटल अथवा इतर हॉस्पिटलमध्ये जाण्याची मनस्थिती नव्हतीच. वडिल भयंकर टेंशन घेतात, त्यामुळे त्यांना न सांगता डॉ. प्रवीण माने दादाना फोन केला. प्रवीण माने हक्काचे व्यक्ती यासाठी ते धारकरी आहेत. आणि दुसरी गोष्ट कोरोना काळात चाललेली त्यांची उपचार पद्धती आणि कार्य मी पाहत होते. त्यांना फोन केल्यावर, त्यांनी काही औषधे लगेच सुरू करण्यासाठी सांगितले. त्यांनी घरातल्या सर्वांसाठी औषधे दिली. दोन दिवसात आम्हाला फरक जाणवू लागला. दादांनी लक्षणे जशी बदलतील तसा लगेच संपर्क करायचा असे सांगितले होते. तिसऱ्या दिवशी छातीत दुखत होते. मग पुन्हा संशय की कोरोनाच आहे. मग दादांना फोन केला. तर त्यांनी श्वास चेक केला. पण स्थिती नॉर्मल होती. पुढे एकूण 7 दिवसांच्या कोर्सपैकी 4 दिवसात ठणठणीत झालोच, पण आईला अनेक वर्षे गॅसचा त्रास होता तो देखील बरा झाला. अगदी आयुर्वेदिक औषधाने. दादांना फोन करून माहिती दिली, की सात दिवस होऊन गेले आहेत. आणि आम्ही अगदी व्यवस्थित आहोत. 


काहीजणांना आयुर्वेद आवडत नाही किंवा धर्मशास्त्र वैगरे वाटतं. पण 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' या म्हणीप्रमाणे मी त्याचा अनुभव एकदा नाही अनेकदा घेतला आहे. मी ज्यावेळी दादांना फोन केला, त्यावेळी भयानक टेंशन मध्ये होते. कोरोना झाला होता, की नाही माहीत नाही. पण भीतीचा कोरोना मात्र नक्की झाला. आणि पुढे मला चव समजणे आणि वास  येणे बंद झाले होते. पण हि जी निर्माण झालेली भीती कशी गेली? तर दादांनी सहज हाताळलेली परिस्थिती. आणि दुसरी गोष्ट त्यांनी संपूर्ण ट्रीटमेंटमध्ये पारदर्शकता ठेवली. कुठेही म्हंटले नाही, कि बाहेरच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवू नका. उलट तशी शक्यता वाटली असती तर हॉस्पिटलचा पर्याय होताच. दादा पहिल्याच वेळी इतक्या सहजतेने संवाद साधत होते, कि माझी अक्षरश: भीती पळाली. डॉ. प्रवीण दादा म्हणाले, की ताई जरी पुढे भविष्यात आलाच कोरोना तर त्यातूनही तुम्ही सहज बाहेर निघाल. मला काहीही झाले, तरी लगेच फोन करायचा घाबरायचे नाही. इतरांपासून तर मी लांब राहिलेच होते. सर्वप्रकारची काळजी देखील घेतली. पण एक रात्र अशी भयंकर गेली, की माझ्या हृदयाचे ठोके धडधड जोर जोरात वाजू लागले. थंडी असताना देखील भयानक घाम फुटला होता. पण माझा औषध उपचारावर देखील तितकाच विश्वास होता. फेसबुकवर विश्रांती घेण्याबाबत बोलले त्यानंतर अवघ्या दोन दिवसात पुन्हा लिहू लागले, ते प्रवीण दादांमुळे. पण एक सांगू इच्छिते, की कोणत्याही आजाराला दुर्लक्षित करू नका. लहानात लहान लक्षण देखील लगेच डॉक्टराना सांगा. कारण लहान लक्षण खूप मोठ्या आजाराची सुरुवात असते. दादांचे आभार मानण्यासाठी हा लेखप्रपंच. कारण बाहेर काळाबाजार सुरु असताना काही डॉक्टर मात्र आपला फायदा न पाहता, धनाची चिंता न करता मनाची जोपासना करत आहेत. 

डॉ. प्रवीण माने यांचा वैयक्तिक परिचय देयचा झाला तर, नेहमी ह्सतमुख चेहऱ्याने संवाद साधणारे व्यक्तिमत्व. पैशाच्या अपेक्षेपेक्षा मनामध्ये विनम्र सेवाभाव ठेवतात. त्याची प्रचिती त्यांच्या चेहर्याकडे पाहून समजते. रुग्णाची तब्येत आणि त्यात होणारी सुधारणा याची काळजी ते जास्त करतात. त्यांचे पेशन्ट हे केवळ महाराष्ट्रात नाहीतर, महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेरही आहेत. जे नक्कीच समाधानी आहेत. दादांनी कोरोना काळातही निस्वार्थ सेवाभाव दिलेला आहे. तसेच ते आ. संभाजीराव भिडे गुरुजींचे शिष्य असून छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने कार्य करत आहेत. 

- नेहा जाधव


Post a Comment

1 Comments