Thane Marathi Dispute : ठाण्याने निवडून दिलेले मराठी १७ आमदार; ३ खासदार गेले कुठे?


कल्याण येथे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातच एका मराठी माणसाला मारहाण करण्यात आली..हे प्रकरण ताजे असताना काल मुंब्रा येथे मराठी बोलण्यासाठी आग्रह धरणाऱ्या तरुणाला एका झुंडीने घेरले..त्याला हिंदीत माफी मागायला लावली आणि एवढेच नव्हे तर पोलिस स्थानकात जाऊन तिथेही त्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. असे सर्व होत असताना आजूबाजूला असणाऱ्या केवळ मराठी माणसांना नव्हे तर पोलिस प्रशासनाला देखील त्या तरुणाची बाजू घ्यावी वाटली नाही याहून महाराष्ट्रासाठी लज्जास्पद गोष्ट कोणती? 

पुढल्या महिन्यात मराठी दिन येत आहे. सर्वांच्या स्टेट्स, रीलस, स्टोरीमध्ये मराठी बाणा जागा होईल.. मग माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट काय अन "माझ्या मराठीचीये बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके अशी एक दिवसाची अस्मिता झळकेल.. आणि पुढे??? खातोय मराठी माणूस मराठी राज्यात मार.. 


मराठी माणसावर ही वेळ कोणी आणली? मराठी लोकप्रतिनिधी कुठे आहेत? यावर उपाय काय?

ठाण्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय निर्माण झाल्याने मराठी आकडा हळूहळू कमी होत चालला आहे. गेले काही दिवस हे प्रकार प्रामुख्याने ठाण्यात घडत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मध्यंतरी म्हंटले होते, की ठाणे हा एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये 7 महानगरपालिका आहेत..एवढ्या मोठा प्रमाणात ठाणे शहर पसरले ते कशामुळे याचा आपण विचार कधी केलाच नाही. गेल्या 5 ते 6 वर्षात रेल्वे स्टेशनची लांबी वाढली.. मुंबईतून ठाणे दिशेने आणि ठाण्यातून मुंबईच्या दिशेने भरून येणारी रेल्वे ही मुंब्रा, कळवा, दिवा, डोंबिवली, कल्याण ते बदलापूर येथे वाढती लोकसंख्या दर्शवते. नोकरीसाठी मुंबईमध्ये येणारे परप्रांतीय स्वस्तात राहायला घर मिळते म्हणून दिवा, डोंबिवली, बदलापूर अशा ठिकाणी राहतात..हळूहळू आपले क्षेत्र वाढवतात, धंदे वाढवतात आणि पुढे जाऊन तीच माणसे मराठी माणसाच्या मुळावर उठतात. 



ठाण्यात वाढणारी लोकसंख्या हा प्रश्न गंभीर आहे.. याचा मराठी माणसाने कधीच विचार केला नसेल. 

पण अशा वेळी आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कुठे असतात? 

ज्या मुंब्रामध्ये ही घटना घडली त्या मुंब्राचे कैवारी जितेंद्र आव्हाड आपल्या मतदारांसाठी इतके पक्के आहेत की आव्हाड साहेबांमुळे एका विशिष्ट समाजाला विकटींम कार्ड फ्री मध्ये मिळाले आहे. साहेबांचं कसं आहे एखादी घटना मुंब्राबाहेर घडली की साहेब तत्परतेने धावत जातात, अगदी रडतातही.. पण तीच घटना त्यांच्या मुंब्रामध्ये घडली की ते विनंती करतात की जातीय रंग देऊ नका..साहेबांचे म्हणणे आहे की हा वाद लहान पोरांचा आहे. अहो साहेब एका तरुणाला लोकांनी घेरले, त्याला शिव्या दिल्या, त्याला मारण्याची धमकी दिली असताना तुम्ही त्या घटनेला पोरांचा वाद म्हणून किरकोळ किंमत देत आहात? मग एखाद्याचा जीव गेल्यावर तुमचे विकटींम कार्ड बाहेर येणार होते का? जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रियेमुळे समजून येते की आम्ही मराठी बोलणार नाही..असा माज नेमका कोणामुळे आला आहे. 

या प्रकरणानंतर आपण मराठी उमेदवार निवडून दिले पाहिजेत एक अशी कुजबूज ऐकू येत आहे. परंतु, या घटना ज्या ठाण्यात हल्ली सातत्याने घडत आहेत त्या भागात मराठीच आमदार आहेत की..एकनाथ शिंदे, रमेश पाटील, जितेंद्र आव्हाड, रवींद्र  चव्हाण, निरंजन डावखरे, मंदा म्हात्रे, राजेश मोरे यासह दहा मराठी आमदार यावेळी ठाण्याने दिले आहेत, एवढेच नव्हे तर तीन खासदार मराठी आहेत.. असे असतानाही ठाण्यात अशा घटना घडत आहेत.. आणि त्यांसाठी सत्तेत नसलेल्या मनसेला पुढे यावे लागत आहे तर ठाणेकरांची मतं गेली कुठे? हे मराठी लोकप्रतिनिधी मराठी भाषेसाठी यापुढे काही ठोस पावले उचलणार आहेत की नाही?

तीन महिन्यांआधी राज्य सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. सर्वत्र मोठा उत्सव साजरा करण्यात आला..पण अगदी दोन-तीन महिन्यातच या मराठी भाषेसाठी मराठी माणसाला संघर्ष करावा लागत आहे. मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये फ्लॅट नाही मिळणार, मराठी माणसाची भाषा नाही बोलली जाणार, मराठी भाषिकांना रस्त्यावर धंदे करण्यास बंदी केली जाणार, मराठी माणसं कशी आहेत? पुरणपोळीसारखी गोड? अरे तो तर रीलचा कंटेट आहे..मराठी माणसे चिप आहेत..आणि हे कुठे ऐकायला मिळत आहे? खुद्द महाराष्ट्रात!

आपण भारताच्या दक्षिण भागात गेलो तर समजेल तिथे हिंदीला देखील जागा नाही. भारतात इंग्रजी भाषेला खूप महत्त्व दिले जाते.. जो इंग्रजी बोलत नाही तो गावठी, त्याला नोकरीमध्ये प्राधान्य दिले जात नाही. परंतु, जगात सर्वात जास्त चीनी, मग स्पॅनिश या भाषा बोलल्या जातात, तर सगळ्यात प्राचीन भाषेमध्ये आपल्या संस्कृत भाषेचा क्रमांक लागतो. 

शिवरायांनी शत्रूला पत्र पाठवताना फारसी आणि उर्दूचा वापर केला, पण राज्यभिषेका नंतर मात्र मराठी भाषा त्यांनी अंगिकारली आहे. धर्मवीर संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिला. ज्या राजाचे ३६५ दिवस आपण गोडवे गातो, त्या राजाने स्वीकारलेली भाषा मात्र आपल्याला स्वीकारता आली नाही. भारतावर हुकुमत चालवणार्या इंग्रजांचा शेवटचा व्होईसरॉय एलफिस्टन जेव्हा भारतात आला तेव्हा त्याने आधी इंग्रजी आणि मराठी शिक्षकांची मागणी केली. आज भारताबाहेरील देशात संस्कृतचा अभ्यास केला जातो, पण आज मराठी मातीत मात्र तिला टिकवण्याचे प्रयत्न केले जातात. कलियुगात जसा आपल्याला एकसंघाचा श्राप आहे तसा आपल्याला भाषेचा हि श्राप आहे. म्हणून इतरांनी जे स्विकारल ते मात्र आपण स्वीकारू शकत नाही...!

आपण आशा बाळगूया किमान या घटनेतून आपण सावध होऊन बोलण्यातून, वागण्यातून आधी मराठीला आणि मराठी माणसाला पुढे आणूया. तूर्तास पूर्णविराम.


- नेहा जाधव - तांबे 

Post a Comment

0 Comments