माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या.
नेहा जाधव
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर अनेकांनी मुंबई पोलिसांच्या नावाने बदनामीचे हात धुवून घेतले. मुंबई पोलिसांनी गद्दारी केली अशा पोस्ट देखील समोर आल्या. त्या निमित्ताने आज माझ्याबाबतीत एक जुना पण नेहमी संस्मरणात राहिलेली मुंबई पोलिसांचा प्रसंग लिहीत आहे. तो वाचुन मुंबई पोलीस नेमके कसे आहेत हे समजेल.
रात्री खूप उशीर झाला होता. अकरा वाजून गेले होते. तसे तर माझा उशिरा प्रवास नेहमीचाच. परंतु, पावसाचा ओघ वाढत होता आणि इतर ठिकाणी कामाला असणारे पाऊस पाहून घरी लवकर गेले होते. पत्रकारिता क्षेत्र असल्याने काही कामासाठी मला थांबावे लागले. एकदा का जास्त पाऊस पडला, की 'रक्तवाहिनी' म्हणजेच 'रेल्वे' बंद पडते. आणि मी रेल्वे अचानक बंद पडण्याचा भयानक अनुभव याआधी घेतला आहे. पण, त्यावेळी सुदैवाने माझा भाऊ शैलेश दादा सोबत होता. हा प्रसंग केव्हातरी लिहिनच. पण, आज कोणी नव्हते. त्यामुळे घरातून फोनवर फोन चालू होते. कुठे आहेस? निघालिस का? लवकर निघ..लवकर पोहच. सकाळच्या गडबडीत सिंगल तिकीट काढले होते. त्यामुळे आता मला पुन्हा तिकीट काढायचे होते. घरी पोहचायच्या नादात घाई-गडबडीत तिकीट काढले. पावणे बारा वाजले होते. पण घरी बारापर्यंत पोहचायचे होते. म्हणून बदलापूर ट्रेन आली. तिच्या मागे धावता धावता माझा चुकून एका दारुड्या मुलाला धक्का लागला. तो माझ्या मागे धावत शिव्या देत येत आहे, याची मला कल्पना होती. रात्र झाल्याने एव्हाना प्लॅटफॉर्म खाली झाला होता. गाडी सुटण्याची मनात भीती होतीच, पण गाडी सुटली, तर या दारूड्याच्या कचाट्यात सापडेन ही भीती वेगळीच. गाडी सुटण्याचा हॉर्न वाजला. आणि दरवाजापाशी पोहचणार तोच लेडीज डब्ब्यातून एका पुरुषाचा हात बाहेर आला. आणि मी हात पकडून गाडीत चढले. कोणाचा होता तो हात? तर तो हात होता, 'मुंबई पोलिसाचा'. हो तो हात विश्वासाचा होता. त्या पोलीस दादाने पाच मिनिटे गाडी थांबवून त्या दारुड्याला चांगलेच तासले.
माझा काळाच्या तावडीतून जीव वाचला; तो मुंबई पोलिसांमुळेच! मुंबईत कोटी लोक राहतात. आपल्या अंगावर काळ रात्र ओढवून पोलीस नेहमी रक्ताचे पाणी करून सर्व मुंबईकरांवरील काळाचे सावट दूर करत असतो. पाऊस आला, पाणी भरले रस्त्यावर कोण उतरतो? मुंबई पोलीसच. ज्या नेत्यांच्या भोंगळ काराभारामुळे पाणी साचते ते घरात बसून ऑर्डर सोडतात. पण रस्त्यात कंबरेभर पाण्यात उतरतात मुंबई पोलीस. गणपती आले, दहीहंडी आली, नवरात्र आली तर रात्रभर आपल्याला गर्दीत साथ कोण देतो? रेल्वेतून हात सुटून आपण पडलो, तर आपला जीव वाचवायला धावत्या ट्रेनच्या मागे धावतो कोण? भले तो रेल्वे पोलिस आहे, पण मुंबईचाच ना! हल्ली आतंकवादी हल्ले मुंबईत होत नाहीत. पण अकरा साखळी बॉम्बस्फोट, 26/11 दहशतवादी हल्ला कोणी अंगावर झेलले? मुंबई पोलिसाना काही प्रसंगामुळे प्रश्नाच्या पिंजऱ्यात उभे करण्याआधी, जरा स्वतः च्या मनाला प्रश्न विचारा. जेव्हा तुमचे घरातले तुम्हाला घरी येण्यासाठी काळजीत होते ना; तेव्हा एकीकडे आपला जीव धोक्यात घालून मुंबई पोलीस तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना सुखरूप घरी पोहचविण्याची व्यवस्था करत होते.
हो, मान्य आहे. पेटीत जसे सर्व आंबे गोड नसतात तसेच काही पोलीस देखील आपले कर्तव्य बजावत नाहीत. म्हणून सरसकट संपूर्ण विभागाला दोष देणे चुकच. आपल्याला जसे ऑफिसमध्ये डोक्यावर बॉसचा ताण असतो, तसा पोलिसानाही असतो. हिंमत दाखवून पुढे जायचे म्हंटले, तरी ट्रान्सफर ऑर्डर शिवाय ना जास्त पगार मिळत, ना राहायला धड घराचे छप्पर मिळत. त्यांना तर देशाच्या रक्षणासाठी सुटणाऱ्या बंदुकीतील एक-एक गोळीचा हिशोब पोलिसांना द्यावा लागतो. कोरोना काळात कितीतरी पोलिसांवर 'नालायक', 'देशद्रोही' लोकांनी हल्ले केले. पण तरीही आज देखील प्रत्येक पोलीस तितक्याच निष्ठेने, तुम्ही कितीही वाईट बोललात, तरी सेवा देत आहेत. खऱ्या अर्थी तर विघ्नहर्ता तो आहे, जो घरावर तुळशीपात्र ठेवून आपले विघ्न दूर करत आहे.
- नेहा जाधव
0 Comments